mrityunjaymahanews
अन्य

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक विशेष

गुरुवार दि.१० सप्टेंबर २०२६

 

जिल्हा बँकेकरीता आजरा तालुक्यात सुधीरभाऊंच्या विरोधात मुकुंददादा अशी लढत होणार…?

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकी पाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले असून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर आता राजकीय हालचाली वेगावल्या असून संस्था गटातून विद्यमान संचालक व जिल्हा परिषदेचे सदस्य सुधीरभाऊ देसाई यांच्या विरोधात आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई यांना रिंगणात उतरवण्यासाठी विरोधकांनी व्यूहरचना सुरू केली आहे. कांही दिवसांपूर्वी सुधीरभाऊ देसाई हे जिल्हा बँक निवडणूक एकतर्फी जिंकतील असे चित्र असतानाच विरोधकांनी थेट मुकुंददादा देसाई यांचे नाव पुढे आणल्याने सुधीरभाऊंची राजकीय कोंडी होणार असे दिसू लागले आहे.

गत निवडणुकी दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी घेतलेला ‘पंगा” अशोकअण्णा चराटी यांना चांगलाच महागात पडला होता. जिल्हा बँकेनंतर झालेल्या तालुका खरेदी विक्री संघ, आजरा साखर कारखाना निवडणुकीतही ना. मुश्रीफ यांनी अशोकअण्णा चराटी यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. या सर्व घडामोडीत सुधीरभाऊ देसाई अग्रभागी होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र चराटी यांनी सावध भूमिका घेत मुश्रीफ यांच्याशी संधान बांधले. मंत्री मुश्रीफ यांना चराटी यांच्या राजकीय ताकतीची जाणीव असल्याने त्यांनी चराटी यांना पुन्हा एक वेळ जवळ केले आहे. परिणामी चराटी यांच्या ताब्यात नगरपंचायत गेली आहे.

अलीकडे झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा, शिवसेना शिंदे गट यांच्याशी मुकाबला करत मंत्री मुश्रीफ यांच्या मदतीने सुधीरभाऊंनी जिल्हा परिषद जिंकलीच पण त्याचबरोबर सभागृहातील गटनेतेपदही मिळवले. या निवडणुकीत अशोकअण्णा चराटी हे सुधीरभाऊंच्या यांच्या विरोधात फारसे आक्रमक दिसले नाहीत. मंत्री मुश्रीफ यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते अशी ओळख असणाऱ्या देसाई यांचा जिल्हा परिषदेत विजय झाला असला तरी विरोधकांबरोबरच अनेक जवळच्या माणसांशी शत्रुत्व घेणारा हा विजय ठरला असल्याची चर्चा आहे.

आजरा साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मुकुंददादा देसाई हे जिल्हा बँकेकरीता इच्छुक आहेत. नेमका हाच धागा पकडत राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सुधीर देसाई यांच्या विरोधकांनी मुकुंदराव देसाई यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले आहे. मुकुंदराव देसाई देखील आपणाला उमेदवारी नको अथवा आपण इच्छुक नाही असे सांगत नसल्याने वातावरणाचा अंदाज घेऊन मुकुंदराव रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे.

जयवंतराव शिंपी गट व सुधीर देसाई यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. विष्णुपंत केसरकर, जयवंतराव सुतार ही मंडळी सुधीरभाऊंकडून जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेली आहेत. यामुळे ही सर्व मंडळी सुधीरभाऊंच्या विरोधात राहतील असे दिसत आहे. संस्था गटाचे १११ ठराव दाखल झाले आहेत. आरोग्य मंत्री ना .प्रकाश अबिटकर यांच्या शिंदे सेनेसह प्रमुख मंडळींनी आपल्या विश्वासू मंडळींचेच ठराव करून घेतले आहेत. आमदार शिवाजी पाटील सुधीरभाऊ व मुकुंददादा यांच्यापासून समान अंतरावर आहेत. त्यामुळे ते यात फारसे लक्ष घालतील असे दिसत नाही.

निवडणुकीमध्ये ‘ट्विस्ट’ निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. एकंदर राजकीय घडामोडी पाहता मंत्री मुश्रीफ यांच्या राजकीय तालमीत तयार झालेल्या विद्यमान संचालक सुधीर देसाई यांना राजकीय कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यात कितपत यश येणार हे लवकरच स्पष्ट होईल.

अशोकअण्णांची भूमिका महत्त्वाची…

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे पॅचअप झाले आहे. त्यांचे व मुकुंदरावांचे निकटचे संबंध आहे. सध्या त्यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. गोकुळच्या रिंगणात ते निश्चितच असणार आहेत. त्यांचे जिल्हा बँकेचे ठरावधारक सुधीर देसाई यांच्या पाठीशी राहतील का ? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशोकअण्णांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.

‘डी’ फॅक्टरचा फॉर्म्युला संपुष्टात…?

यापूर्वीच्या निवडणुकीत तालुक्यात राजकारणावर पकड असणारे बहुतांशी ‘देसाई’ मंडळी सुधीर देसाई यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी मात्र थेट मुकुंदरावांना आखाड्यात उतरवल्यास मतदानामध्ये फूट पडून त्याचा फटका सुधीर देसाई यांना कसा बसेल याचीही चाचपणी सुरू आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव देसाई

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले जमा अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची माहिती

mrityunjay mahanews
error: Content is protected !!