mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार सातच्या बातम्या

 

गुरुवार दि.१० सप्टेंबर २०२६

आजरा बँक वर्षभरात शेड्युल्ड बॅंक होणार : अध्यक्ष चराटी

आजरा अर्बन बँकेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

आजरा : प्रतिनिधी

आजरा अर्बन बँकेचा एकूण व्यवसाय २ हजार कोटीच्या पुढे गेला आहे. सर्वांना सोबत घेऊन ही वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच बँकेने मोठी झेप घेतली आहे. बँक मोठी करण्यात सर्वच घटकांचे योगदान लाभले आहे. लवकरच बँकेचे शेड्युल बँकेत रूपांतर होणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी केले. ते आजरा अर्बन बँकेच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बँकेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.

स्वागत व प्रास्ताविक करताना अध्यक्ष चराटी म्हणाले, सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर बँकेने १ हजार ५०० कोटीचा ठेवीचा टप्पा तसेच १ हजार कोटीचा कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना बँक चांगल्या प्रकारे राबवत आहे. संचालक मंडळाने बँक शेड्युल्ड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा दर्जा बँकेला लवकरच प्राप्त होईल. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या बँकेने मुंबई, पुणे, कोल्हापूर सह महत्त्वाच्या शहरात शाखा सुरू केल्या आहेत. त्यांचे कामकाज उत्तमपणे सुरू आहे, हे विश्वासाचे प्रतीक आहे. मल्टीस्टेट असलेल्या आजरा बँकेचा लवकरच गोवा राज्यात विस्तार करण्याचा मनोदय आहे.

सभा नोटीस, विषय पत्रिका वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. सभासदांच्या लेखी प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी उत्तरे दिली. यावेळी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल अध्यक्ष अशोक चराटी तसेच स्वातंत्र्य गौरव भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. संदीप देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विजयकुमार पाटील यांनी आभार मानले.

यावेळी उपाध्यक्ष संजय चव्हाण, सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर, शैला टोपले, अनिकेत चराटी, सिद्धेश नाईक, ऋषिकेश सातोसकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, विनय सबनीस, आनंदा फडके, मारुती मोरे, दशरथ अमृते, जी. एम. पाटील, शशिकांत सावंत यांच्यासह अण्णाभाऊ संस्था समूहातील संस्थांचे पदाधिकारी, सभासद, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आजरा सुत गिरणीला १ कोटी २५ लाखांचा नफा- डॉ.अनिल देशपांडे
सुतगिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

आजरा : प्रतिनिधी

जागतिक स्तरावरील संकटांमुळे सुत गिरण्या अडचणीत असतानाही आजरा सुत गिरणीत काटकसर व योग्य निर्णय घेतल्याने सुत गिरणीला १ कोटी २५ लाखांचा नफा झाल्याचे उपाध्यक्ष डॉ अनिल देशपांडे यांनी सुतगिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.या सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा चराटी होत्या.

स्वागत अन्नपूर्णा चराटी यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव संचालक राजाराम पोतनीस यांनी मांडला. प्रास्ताविक सुत गिरणीचे उपाध्यक्ष डॉ अनिल देशपांडे यांनी केले.आजरा सुत गिरणी सध्या २५ हजार चात्यांची असून पूर्ण क्षमतेने सुरु आहे. अत्याधुनिक मशिनरी बसवल्याने सुत टनात वाढ झाली आहे. सुताचा दर्जाही कायम ठेवला आहे.गेल्या तीन चार वर्षांत जागतिक स्तरावर अनेक संकटे निर्माण झाली याचा फटका सुत गिरण्यांना बसला आहे.सुताची निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत भरपूर प्रमाणात उपलब्ध झाल्याने दरात वाढ नाही.पावसाचे प्रमाण कमी अधिक झाल्याने कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.असे असतानाही आजरा सुत गिरणीने योग्य नियोजन करत कापूस व सुत यामध्ये समन्वय साधला असल्यामुळेच सुत गिरणी नफ्यात आहे.काटकसर व योग्य नियोजनामुळेच सुत गिरणी सुस्थितीत आहे.

मोठ्या प्रमाणावर सूतगिनेला वीज बिल भरावे लागत असल्याने बीओटी तत्वावर सोलर वीज निर्मिती करुन तसेच गारमेंटचे नियोजन करून संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचा संचालकांचा प्रयत्न रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जेष्ठ संचालक व अण्णा भाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष अशोक चराटी यांनीही मनोगत व्यक्त करत भविष्यात सुत गिरणीला यशाच्या शिखरावर नेणार असल्याची ग्वाही दिली.सल्लागार चंद्रशेखर फडणीस यांनीही मनोगत व्यक्त केले.

विषय वाचन अधिकारी दत्तात्रय दोरुगडे यांनी केले.सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.या सभेत अशोक चराटी यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल तसेच अनिकेत चराटी, राजाराम पोतनीस,जी. एम. पाटील, डॉ.संदीप देशपांडे यांचा निवड व पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन सचिन सटाले तर आभार शशिकांत सावंत यांनी मानले.

सभेस विलास नाईक, डॉ.दीपक सातोसकर,विजय पाटील,रमेश कुरुणकर,आजरा अर्बन बँकेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण व सर्व संचालक, नगरसेवक डॉ.इंद्रजित देसाई,ॲड.सचिन इंजल, मारुती मोरे यांच्यासह सुत गिरणीचे सर्व संचालक, अधिकारी व सभासद उपस्थित होते.

शृंगारवाडी येथे पाणी मोटर्सच्या केबल चोरीला

आजरा : प्रतिनिधी

शृंगारवाडी (ता. आजरा) येथील बाग नावाच्या शेतात जमीन गट नंबर १०७ मध्ये पाण्याच्या मोटरची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी अंकुश तुकाराम तारळेकर (वय ३७, रा. शृंगारवाडी) यांची ७०० फूट (२१३ मीटर) लांबीची सुमारे १०,६५० रुपये किमतीची आणि महादेव रामू चौगुले यांची ४०० फूट (१२१ मीटर) लांबीची ६,०५० रुपये किमतीची काळ्या रंगाची चपटी केबल मिळून एकूण १६,७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल पन्हाळकर हे अधिक तपास करीत आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून झुडपे तोडा; उपसभापती सौ. यशोदा पोवार यांची मागणी

आजरा : प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे तोडण्यात यावीत, अशी ठ मागणी आजरा पंचायत समितीच्या प्रभारी सभापती व उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आजरा येथील उपअभियंत्यांना प्रत्यक्षात भेटून दिले.

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे आजरा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळण झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. येत्या १४ सप्टेंबरपासून लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव सुरू होत असून या उत्सवासाठी मुंबई, पुणे व इतर महानगरांहून नागरिक व चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी दाखल होत आहेत.

त्याचप्रमाणे सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्ती वाजतगाजत सुरक्षितपणे आणण्यासाठी भाविक मोठ्या वाहनांचा वापर करतात. रस्त्यांवरील धोकादायक खड्ड्यांमुळे व रस्त्यांच्या कडेला वाढलेल्या दाट झाडेझुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोणताही अपघात अथवा अनुचित दुर्घटना घडू नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ मुरुम टाकून खड्डे मुजवावेत व दुतर्फा असलेली झुडपे तोडून रस्ते सुरळीत करावेत, अशी आग्रही मागणी उपसभापती सौ. पोवार यांनी केली.

जिल्हा बँकेकरीता आजरा तालुक्यातील ठराव परिस्थिती…

दहीहंडी 

राघव सरदेसाई युवा मंचच्या दहीहंडीवर गडहिंग्लजच्या नेताजी पालकर व्यायाम शाळेचे वर्चस्व. प्रचंड उत्साहात पार पडला कार्यक्रम…

(सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात…)

मृत्युंजय महान्यूजच्या वृत्ताचा दणका…
,PQC थरावरील टायरचे चट्टे मुजवण्यास सुरुवात

उत्तूर : प्रतिनिधी

उत्तूर-गडहिंग्लज मार्गावरील नव्याने टाकण्यात आलेल्या PQC थरावर वाहनांच्या टायरचे चट्टे पडल्याबाबत ‘मृत्युंजय महान्यूज’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून, रस्त्यावरील नुकसानग्रस्त भागाची दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज संबंधित ठिकाणी पडलेले टायरचे चट्टे मुजवून रस्ता पुन्हा समतोल करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले.PQC थर पूर्णपणे सेट होण्यापूर्वी वाहतूक झाल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी टायरच्या खुणा व चट्टे पडले होते. या ठिकाणी आता चट्ट्यांच्या मधील उंच-सखल भागात हाताने काँक्रीट भरून पृष्ठभाग समतोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे चट्टे व नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे संबंधित ठेकेदारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.नवीन रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असतानाच PQC थराच्या नुकसानीचा मुद्दा मृत्युंजय महान्यूज ने ठळकपणे मांडला होता. त्यानंतर या बाबीची दखल घेत दुरुस्तीची कार्यवाही सुरू झाल्याने वृत्ताचा परिणाम झाल्याचे चित्र आहे. उर्वरित ठिकाणचे चट्टेही तातडीने मुजवून रस्ता वाहनधारकांसाठी सुरक्षित करण्यात येणार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : १० सप्टेंबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (सकाळी १०.३३ पर्यंत) त्यानंतर अमावस्या तिथी
नक्षत्र : मघा नक्षत्र (दुपारी ०२.०३ पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
योग : सिद्ध योग (सायंकाळी ०७.१७ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : शकुनी करण (सकाळी १०.३३ पर्यंत) त्यानंतर चतुष्पाद करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.०८ ते दुपारी ०३.४० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी १२.५९
सूर्योदय : सकाळी ०६.२६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भोंदू बाबाच्या जादूटोण्याने मलिग्रे पंचकोशी हादरली…

mrityunjay mahanews

बाहुबली कोण ?आज फैसला…

mrityunjay mahanews

मंगळवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!