mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

बुधवार दिनांक ९ सप्टेंबर २०२६

देव तारी त्याला कोण मारी…

आजरा: प्रतिनिधी

आजरा बसस्थानकाशेजारी असणाऱ्या एका उघड्या गटांमध्ये काल मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास  धोंडीबा पाटकर हा ७० वर्षीय वृद्ध तोल जाऊन पडला. दुर्दैवाने गटरमध्ये बांधकामाकरता वापरण्यात आलेली सळी उघडी असल्याने ती थेट त्याच्या मानेत घुसली या प्रकरणाने आजूबाजूच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. मानेमधून आरपार सळी गेल्याने त्याला बाहेर काढणे अडचणीचे झाले.अखेर कटरच्या सहाय्याने सळी कट करून मानेत तशीच ठेवून त्याला रुग्णवाहिकेतून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. या थरारक दृश्याने अनेक जण घाबरून गेले .

गडहिंग्लज येथे उपजिल्हा रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार करून मानेतील सळी काढण्यात आली. जणू काही झालेच नाही अशा पद्धतीने सदर वृद्ध रुग्णालयात वावरू लागल्याने अनेकांनी डोक्याला हात लावला. केवळ दैव बलवत्तर म्हणून या वृद्धाला यातून जीवदान मिळाले असेच म्हणावे लागेल.

स्वराज्य तालमीची दहीहंडी वाघाच्या तालमीच्या गोविंदांनी फोडली..

ढोल ताशाच्या निनादात मा. नगरसेवक अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या वतीने बांधण्यात आलेली स्वराज्य तालमीची दहीहंडी येथील वाघाच्या तालमीच्या गोविंदाने फोडली. प्रचंड उत्साहात सदर कार्यक्रम पार पडला.

राजर्षी शाहू सन्मान सोहळा २०२६” पुरस्काराने अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटींचा गौरव

आजरा : प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, समाजोपयोगी आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल अण्णा भाऊ संस्था समूह, आजराचे प्रमुख श्री. अशोकअण्णा चराटी यांना नवभारत-नवराष्ट्र समूहाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित “राजर्षी शाहू सन्मान सोहळा २०२६” पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.

हा पुरस्कार खास. मा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन श्री. चराटी यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

श्री. अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा भाऊ संस्था समूहाने पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समाजकल्याणाच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या गौरवाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आज आजऱ्यात दहीहंडीचा पुन्हा थरार…

विविध कार्यक्रमांची रेलचेल

आजरा : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचा थरार बुधवार दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून आजरा हायस्कूल आजरा येथे रंगणार आहे. राघव सरदेसाई युवा मंच यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी धर्म आणि संस्कृतीचा संगम असणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. १ लाख ११ हजार १११ रुपये बक्षीस असणाऱ्या यंदाच्या दहीहंडीमध्ये कोणते पथक बाजी मारणार? याकडे आजरावासीयांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती संयोजक युवा नेते राघव सरदेसाई यांनी दिली.

राघव सरदेसाई माहिती देताना पुढे म्हणाले, भक्ती आणि शक्तीचा संगम असणारा दहीहंडीचा सण युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वात मोठी दहीहंडी उत्सव आजरा शहरात साजरा केला जातो. यावर्षी २ लाख ११ हजार १११ रुपयाचे बक्षीस दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला मिळणार आहे. याकरिता पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरातील नामांकित दहीहंडी पथक सहभागी होणार आहेत. तसेच सेलिब्रिटी अँकर अस्मिता खटावकर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. ओव्यांसाठी प्रसिद्ध असणारे करवीर कोकिळा शाहीर बाळू हराळे व सहकाऱ्यांचा ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. मराठवाड्यात नामांकित असलेले लातूर येथील धाडस ढोल ताशा पथक या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात येत आहे. या दहीहंडी सोहळ्याचे नेटके नियोजन राघव सरदेसाई युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते राघव सरदेसाई यांनी केले आहे.

आजरा नगरपंचायत हद्दीतील गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मार्गांची तातडीने दुरुस्ती करा… अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा : प्रतिनिधी

आजरा नगरपंचायत हद्दतील गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी व मार्गावरील अतिक्रमणे पार्किंग व इतर अडथळे दूर करावेत अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

यावर्षी अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे सुविधा निर्माण झाली आहे, मात्र काही ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण असून खड्डे व खडीमुळे मूर्ती वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो नुकत्याच मुंबई येथे घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात रस्त्यावरील खड्ड्यामुळे मूर्ती वाहून नेणारे वाहन हादरल्याने जीवित हानी झाली आहे . या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मार्गांची पाहणी करून डागडुजी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबतचे लेखी निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले असून निवेदनावर समिती अध्यक्ष नगरसेवक परशुराम बामणे, नगरसेविका डॉक्टर स्मिता कुंभार, गौरव देशपांडे,पांडुरंग सावरकर,जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, संजय जोशी, जोतिबा आजगेकर,संतोष बांदिवडेकर ,अतुल पाटील, अभिजीत संकपाळ आदींच्या सह्या आहेत.

उत्तूर ग्रामपंचायतीतर्फे पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या आयोजन.

उत्तूर : मंदार हाळवणकर 

‘माझी वसुंधरा अभियान ७.० ‘ अंतर्गत ग्रामपंचायत उत्तूर, यांच्यावतीने गावातील नागरिकांसाठी पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा १४ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घेतली जाणार असून या स्पर्धेसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.
या स्पर्धेमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, लाइटिंग, थर्माकोल व फटाके यांचा वापर न करता केलेली आरास सजावट, सामाजिक योगदान, परिसर स्वच्छता व मूर्ती विसर्जन आणि प्रश्नोत्तरे या निकषांवर स्पर्धकांचे परीक्षण केले जाणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक २००० रु., द्वितीय क्रमांक १५०० रु., तृतीय क्रमांक १००० रु. आणि चतुर्थ क्रमांक ५०० रु. अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.या पर्यावरणपूरक उपक्रमात गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकनियुक्त सरपंच श्री. किरण शंकर आमणगी, उपसरपंच सौ. सुनीता संजय हतीरगे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सचिन रामचंद्र येसादे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

छाया वृत्त…

आजरा नगरपंचायती प्रभाग क्रमांक १७ मधील नगरसेविका प्रा. पुनम किरण लिचम यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न झाला .  नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक अनिकेत चराटी. आजरा अर्बन बँकेचे संचालक सिद्धेश नाईक व प्रभागातील नागरिक उपस्थित होते

उत्तूरच्या प्रश्नांवर अखेर निर्णायक सुनावणी, रखडलेल्या कामांसाठी प्रशासनाला ‘डेडलाइन’

उत्तूर : प्रतिनिधी 

उत्तूर ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळत असून, जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत उत्तूरच्या प्रलंबित विकासकामांवर निर्णायक बैठक पार पडली. उत्तूर बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम, इंदिरानगर प्रॉपर्टी कार्ड, उत्तूर क्रीडांगण व बुद्धविहार बांधकाम या चार महत्त्वाच्या प्रश्नांवर संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित करत तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले.
बैठकीत सरपंच किरण आमणगी यांनी प्रत्येक विषयाची कागदोपत्री माहिती, प्रलंबित अडचणी आणि नागरिकांच्या तीव्र भावना ठामपणे मांडल्या. अनेक वर्षे पाठपुरावा करूनही कामे रखडल्याबद्दल प्रशासनाचे लक्ष वेधत त्यांनी विलंबाची कारणे उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कालमर्यादेत प्रस्ताव निकाली काढून विकासकामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

विशेष म्हणजे, उत्तूर ग्रामपंचायतीकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नसून, या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष आणि संवाद दोन्ही मार्गांनी पाठपुरावा करण्यात आला आहे. सरपंच किरण आमणगी व ग्रामपंचायत सदस्यांनी महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी वेळोवेळी अनेक बैठका व चर्चा करून प्रत्येक प्रश्न शासनापर्यंत पोहोचवला आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच आता प्रलंबित कामे मार्गी लागण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

बैठकीस जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, वसंतराव धुरे, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, संजय उत्तूरकर, राजू खोराटे, मिलिंद कोळेकर, ग्रामपंचायत अधिकारी सचिन येसादे, सचिन फाळके यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“आंदोलन करणे हा लोकशाहीतील आपला अधिकार आहे,मात्र चर्चेतून मार्ग काढणे व प्रश्न सोडवणे हा अधिक सकारात्मक मार्ग आहे. उत्तूर ग्रामपंचायत गावाच्या प्रत्येक प्रलंबित प्रश्नासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, विकासकामे तातडीने पूर्ण होईपर्यंत आमचा पाठपुरावा कायम राहणार आहे.”
….सरपंच – किरण आमणगी

आजचे पंचांग

दिनांक : 9 सप्टेंबर 2026
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (दुपारी 12:30 पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : आश्लेषा नक्षत्र (दुपारी 03:13 पर्यंत) त्यानंतर मघा नक्षत्र
योग : शिवा योग (रात्री 09:51 पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : वाणीजा करण (दुपारी 12:30 पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : कर्क राशी (दुपारी 03:13 पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी 12:36 ते दुपारी 02:08 पर्यंत
सूर्योदय : सकाळी 06:26
सूर्यास्त : सायंकाळी 06:45
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: 2083 विक्रम संवत
शक संवत: 1948 शक संवत

 

संबंधित पोस्ट

सर्फनाला प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी भरपाईपोटी ४२ कोटी ९० लाख रुपये मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

mrityunjay mahanews

पंचायत समिती अधिकाऱ्याचा ऑन ड्युटी मृत्यू

mrityunjay mahanews

क्राईम न्यूज

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!