मंगळवार
१८ ऑगस्ट २०२६

गांधील माशांच्या हल्ल्यात म्हैस दगावली.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बेलेवाडी हुबळगी (ता.आजरा ) येथील गांधील माशशंच्या हल्ल्यात दिनकर तांबेकर यांच्या मालकीची म्हैस गंभीर जखमी होवून मयत झाली.
तांबेकर आंब्याच्या ओढा परीसरात म्हैस चारण्यासाठी घेऊन गेले होते.म्हैस पाणी पिण्यासाठी जात असताना गांधील माश्यांच्या पोहळ्याला धक्का लागला. पोहळ्यावरील माशांनी म्हैशीवर हल्ला केला. म्हैशीला चावून जखमी केले.
तांबेकर यांनी म्हैशीला घराकडे नेऊन तिच्यावर उपचार केले. उपचार सुरू असताना म्हैस मयत झाली. तांबेकर यांनी वर्षभरापुर्वी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मु-हा जातीची म्हैस खरेदी केली होती. म्हैस दररोज १२ लिटर दूध देत होती. म्हैस दगावल्याने त्यांचे दिड लाख रुपयाचे नुकसान झाले.

तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड.संजय पवार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका बार असोसिएशन ची नूतन कार्यकारणी जाहीर होऊन त्यामध्ये अध्यक्षपदी ॲड. श्री. संजय रा. पोवार, उपाध्यक्षपदी ॲड. जावेद दिडबाग व सचिव पदी ॲड. भाग्येश सं. जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यकारणी सदस्य म्हणून ॲड. सुनिता डी पाटील, ॲड. प्रमिला पी. पाटील व ॲड. निष्ठा उ. त्रिरत्ने यांची निवड करण्यात आली. या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नागपंचमीनिमित्त वसंतरावदादा पाटील विद्यालयात सर्पमित्रांचा सत्कार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रावण सोमवार व नागपंचमीनिमित्त वसंतरावदादा पाटील विद्यालय, उत्तूर येथे सर्पमित्र श्री. विजय पाकले, श्री. अभिजीत उत्तूरकर व श्री. तुषार रावळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. विजय पाकले यांनी सर्पांचे पर्यावरणातील महत्त्व आणि सर्प हे मानवाचे मित्र कसे आहेत, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विषारी व बिनविषारी साप, त्यांच्या विविध प्रजाती तसेच सापांविषयी समाजात असणारे समज-गैरसमज याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रजातींच्या सापांच्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. विजय पाकले यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता दहावीचे विद्यार्थी व श्री. एच. एस. हळवणकर सर यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. सानवी संतोष नाईक हिने केले, तर आभार कु. वेदिका अमृत जाधव हिने मानले.
उत्तूर येथे उद्या कर्करोग तपासणी शिबिर
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रामपंचायत उत्तूर व प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ व ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत मंगळवारी (दि. १८) कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्तूर येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग तसेच गर्भाशय मुखाचा कर्करोग यांची तपासणी डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहे. कर्करोगाचे वेळीच निदान होणे उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने उत्तूर व परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिला-भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कौतुकास्पद…

आजरा येथील कुमारी पूजा भिकाजी पाटील हिने COEP TECHNOLOGYCAL UNIVERSITY येथून M.Tech in Data Science ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली.
तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

आजरा तालुक्यात वाड्या -वस्त्यांवर गोकुळच्या इच्छुकांच्या गाठीभेटी सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या वाड्या वस्त्यांवर भेटीगाठी घेणे सुरू झाले आहे.
गोकुळचे सभासद असलेल्या एकूण दूधसंस्था ३०८ आहेत. त्यापैकी ३०५ संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत. प्रारुप मतदार यादीत २९६ संस्थांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध भागात इच्छुक कार्यकर्ते आणि पदाधिकारी संस्थांच्या सभासदांशी संवाद साधत आहेत. दूध दर, सवलती, विकास कामे आणि सहकारातील प्रश्न यावर चर्चा करून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आलिशान गाड्यांचे ताफे वाड्या-वस्त्यांवर दाखल होऊ लागले आहेत.
निवडणूक जवळ येत असल्याने आजरा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
दृष्टीक्षेपात
गोकुळ सभासद दूधसंस्था….
एकूण दूधसंस्था : ३०८
दाखल ठराव संस्था : ३०५
प्रारुप मतदार यादीत नाव असलेल्या संस्था : २९६

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ मध्ये नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.नागपंचमीचे महत्त्व, पूजा कशी करतात ,त्या मागील पौराणिक कथा त्याचबरोबर निसर्गातील सर्व जीवांचा आदर करणे ,पर्यावरणाचे रक्षण करणे, श्रद्धा ,करुणा व सह जीवनाची भावना जोपासणे असा पर्यावरणीय संदेश शुभांगी निर्मळे यांनी दिला. नाग हा पर्यावरणातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग आहे .तो शेतकऱ्याचा मित्र आहे. याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर नागदेवतेची पूजा करण्यात आली.
नागपंचमीचे औचित्य साधून आमच्या विद्यालयातील कु.साक्षी कुंभार ,स्वरा कुंभार, कुमार वरद कुंभार आणि शरंण्या कुंभार यांनी मातीच्या नागाची प्रतिमा करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. पारंपारिक गाण्यांवर विद्यार्थिनीनी झिम्मा -फुगडी घातली. विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
आजरा महाविद्यालयात सर्पपंचमी साजरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विज्ञान-पर्यावरण मंडळ व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आजरा महाविद्यालयात सर्पपंचमी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात सर्पतज्ञ श्री. स्वप्नील असोदे आणि श्री. सौरभ लकमले यांनी ‘सर्प: समज व गैरसमज’ या विषयावर मार्गदर्शन केले.श्री. स्वप्नील असोदे यांनी नाग, मण्यार, घोणस, फुरसे या विषारी तसेच धामण, पान साप, कुकरी, दिवड, मांडूळ, तस्कर, अजगर या बिनविषारी सापांची PPT द्वारे माहिती दिली. साप उंदीर खातात, त्यामुळे रोग आणि अन्नसाखळीचा समतोल राखला जातो, म्हणून साप मारू नयेत असे आवाहन त्यांनी केले.
श्री. सौरभ लकमले यांनी साप डूक धरतो, मांत्रिक विष उतरवतो यांसारखे गैरसमज दूर केले. सर्पदंशानंतर घाबरू नये, दंश झालेला भाग हलवू नये आणि त्वरित सरकारी रुग्णालयात जावे जेथे अँटी-स्नेक व्हेनम उपलब्ध आहे, असे सांगितले. साप मारल्यास वन कायद्यानुसार शिक्षा होते याचीही माहिती दिली.
प्राचार्य डॉ. किरण पोतदार म्हणाले की पर्यावरण संवर्धनासाठी सापांसारख्या वन्यजीवांचे रक्षण करणे ही सामाजिक जबाबदारी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस.पी. गजरे, स्वागत प्रा. एम आर शिंत्रे*श, सूत्रसंचालन *प्रा. श्रीमती टी. सी. जाधव* आणि आभार प्रा. सागर फगरे यांनी मानले.यावेळी उपप्राचार्य डी.पी. संपकाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, समिती प्रमुख डॉ. आर. एस. कर्पे , तसेच डॉ. बी. एम मोहिते, डॉ. एम. आर. ठोंबरे, प्रा. एस. बी. सावंत, प्रा. एस. के. जाधव, प्रा. एम. एस. मुंडे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

निधन वार्ता
शिवाजी देसाई

पेरणोली येथील शिवाजी शामराव देसाई (वय ६० वर्षे) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक जे.एस.देसाई यांचे ते भाऊ, संतोष देसाई यांचे वडील होत. बुधवारी सकाळी ९ वाजता रक्षा विसर्जन आहे.
शिवाजी कदम

वडकशिवाले (ता.आजरा) येथील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शिवाजी गोविंद कदम (वय ६९) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

आजचे पंचांग
दिनांक : १८ ऑगस्ट २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (सायंकाळी ५.५० पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : स्वाती नक्षत्र (१९ ऑगस्ट सकाळी ०६.४६ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
योग : शुक्ल योग (१९ ऑगस्ट पहाटे ०३.२२ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : तैतुला करण (सायंकाळी ०५.५० पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : तूळ राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५३ ते सायंकाळी ०५.२८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१७ ते दुपारी ०१.०८
सूर्योदय : सकाळी ०६.२१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


