mrityunjaymahanews
अन्य

सोमवार-सातच्या बातम्या

सोमवार 

२२ जून २०२६

एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी

२३.५ तोळे सोन्यासह
लाखोंचा ऐवज लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

रविवारी रात्रीच्या सुमारास आजरा येथील शिव कॉलनी रवळनाथ कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन घरे फोडून सुमारे १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास करण्याबरोबरच एका घरासमोर उभा केलेली दुचाकी घेऊन पोबारा केला. सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ . नवनाथ शिंदे यांचे यामध्ये मोठे नुकसान (२३.५ तोळे सोने) झाले आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. याबाबतची लेखी फिर्याद प्रकाश नवनाथ शिंदे यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

गांधीनगर रोडवरील शिव कॉलनी येथे डॉ. शिंदे यांचे दुमजली घर आहे. नेहमीप्रमाणे डॉक्टर शिंदे यांचे कुटुंबीय तळमजल्यावर रात्रीचे जेवण करून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते.

सकाळी नऊ वाजता सुमारास कुटुंबीय खाली आले असता कुलूप व कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दागिने व रोख रक्कम ठेवलेली पेटी नेण्याबरोबरच घरातील कपाटे फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने, दुर्मिळ नाणी व रोख रक्कम असा सुमारे १२ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे निदर्शनास आले. शिंदे यांच्या शेजारील युवराज जाधव यांच्या घराचे कडी कोयंडे उचकटून काढून त्यातील सोन्या-चांदीचे सुमारे ८० हजार रुपयाचे दागिने लंपास केले. दोन घर पुढे केल्यानंतर जाताना आनंदवन कॉलनीतील संजय यशवंत भोई या शिक्षकाच्या घरासमोर लावलेली दुचाकीही चोरट्याने लंपास केली.

चोरीच्या पार्श्वभूमीवर तातडीने श्वानपथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व फॉरेन्सिक लॅबच्या टीमला पाचारण करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

रात्री दीडच्या सुमारास चोरीचा अंदाज

रात्री दिड वाजण्याच्या सुमारास या भागातील कुत्र्यांचा गोंधळ सुरू होता. या दरम्यानच चोरी झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान श्वान पथकाचाही फारसा उपयोग झाला नाही. दुचाकी चोरी गेलेल्या भोये यांच्या घराजवळच श्वान पथक घुटमळले.

पावत्या जमा करताना दमछाक …

चोरीला गेलेल्या सोन्याच्या जिन्नसांच्या खरेदी पावत्या सादर करताना काही वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सोन्याच्या खरेदी पावत्या, वडिलोपार्जित सोन्याच्या पावत्या कुठून सादर करायच्या ? असा प्रश्न अशा घटनांमध्ये तक्रारदारांसमोर वारंवार येत असून यामुळे  चोरी झालेले सोने व प्रत्यक्ष सादर केलेल्या पावत्या यामध्ये मोठी तफावत दिसते. यामुळे मोठ्या प्रमाणावर दागिने चोरीला जाऊनही केवळ पावत्या असणाऱ्या सोन्याची नोंद पोलीस दप्तरी होताना दिसते.

भादवण येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण ता. आजरा येथील कमल विठ्ठल गाडे या ५३ वर्षीय महिलेचा सर्पदंशानंतर सुरू असलेल्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सौ. गाडे या चार दिवसापूर्वी शेतात कामासाठी गेल्या असता त्यांना सर्पदंश झाला. उपचारासाठी त्यांना कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.

चित्री पर्यटकाची गाडी फोडली…
किरकोळ साहित्य लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चित्री प्रकल्प स्थळी पर्यटनासाठी आलेल्या कृषी अधिकारी एस. एच. जज्जललवार यांच्या उभ्या चारचाकीवर दगड टाकून काचा फोडून त्यातील किरकोळ साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

जज्जलवार हे कुटुंबीयांसोबत पर्यटनासाठी चित्री प्रकल्प स्थळी आले होते. रस्त्याशेजारी गाडी उभी करून ते प्रकल्प पाहण्याकरता प्रकल्पावर गेले असता परतल्यानंतर दरवाज्याची काच दगड टाकून फोडून त्यातील एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड यासह किरकोळ साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले.

चित्रीवर बंदोबस्त आवश्यक…

चित्री प्रकल्प स्थळी पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. रविवारी घडलेल्या या प्रकरणानंतर प्रकल्प स्थळी पोलीस बंदोबस्ताची गरज अधोरेखित झाली आहे.

योग दिवस उत्साहात…

व्यंकटराव शिक्षण संकुल…

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्यंकटराव शिक्षण संकुल व आजरा नगरपंचायत महिला बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.दिपप्रज्वलनानंतर सौ चारुशीला जयदीप मोकाशी जाधव व कन्या साईस्वरी जयदीप जाधव यानी योग प्रात्यक्षिकाबरोबरच योगाचे मानवी जीवनातील स्थान व महत्त्व पटवून सांगितले. पूरक हालचाली पासून ते सूर्यनमस्कार, भुजंगासन, ताडासन, पद्मासन, वज्रासन, ,वृक्षासन यासारख्या अनेक आसनांचे प्रात्यक्षिक व महत्त्व सांगितले. तसेच अनुलोम विलोम प्राणायाम ओंकार प्रार्थना करण्यात आली. योगासारख्या भारतीय प्राचीन संस्कृतीचा ठेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे तसेच “आजच्या अतिशय धावपळीच्या युगामध्ये आपल्या मनावर बुद्धीवर भावनेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही” असे आजरा महाल शिक्षण मंडळाचे सचिव व नगरसेवक अभिषेक  शिंपी आपले विचार मांडले. नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांनी आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी आजरा नगरपंचायत महिला बालकल्याण सभापती निशाद समीर चांद, अधीक्षक वैभव म्हाकवेकर, सदस्या नगरसेवक श्रीमती कलावती कांबळे, स्वीकृत नगरसेवक विक्रम पटेकर, आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक सचिन भैय्या शिंपी, व्यंकटराव शिक्षण संकुलातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता झुम्बा डान्स इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी व मार्गदर्शिका आर एन पाटील मॅडम यांनी केली. क्रीडा शिक्षक एस एम पाटील यांनीही विद्यार्थ्यांसोबत प्रात्यक्षिके केली. 

 आजरा हायस्कूल आजरा… 

आजरा हायस्कूल, आजरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त योगशिक्षक श्री. संदीप कुंभार यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच योगाचे आरोग्यदायी महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक सादर केले. क्रीडाशिक्षक श्री. एम. एस. गोरे व सौ. एम. व्ही. पाटील यांनीही विद्यार्थ्यांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक श्री. एम. एस. गोरे यांनी केले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर, उपमुख्याध्यापिका सौ. एच एस कामत, पर्यवेक्षक श्री. ए. आर. व्हसकोटी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

पं. दीनदयाळ विद्यालय… 

 आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पं.दीनदयाळ विद्यालय आजरामध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आजरा नगरपंचायत आजरा महिला व बालकल्याण विभाग व पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजित करण्यात आले होते. योग म्हणजे काय? योगाचे महत्त्व काय आहे? या संदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले. योग प्रशिक्षिका सौ .चारुशीला मोकाशी यांनी प्रथम योगा बद्दल मार्गदर्शन केले .विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योगाचे किती महत्त्व आहे ?योग का करावा? या संदर्भात सखोल माहिती सांगितली. प्राणायामचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी व त्यांची कन्या साईश्वरी मोकासे यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे योगाचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी आजरा नगरपंचायचे अधीक्षक वैभव माकवेकर , महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ निशांत चांद , नगरसेविका स्मिता कुंभार ,श्रीम कलावती कांबळे, चांद सर तसेच आजरा नगरपंचायत चे इतर कर्मचारी उपस्थित होते. स्मिता मॅडम यांनी योग प्रशिक्षणासाठी विद्यालयाने दिलेल्या प्रतिसादासाठी विद्यार्थी तसेच शिक्षका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश प्रभू यांनी मानले. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.

जागतिक योग दिनानिमित्त उत्तूरमध्ये योगाचे महत्त्व अधोरेखित.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

जागतिक योग दिनानिमित्त  उत्तूर परिसरातील विविध शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी योग प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योगपटू यश्वी रावसाहेब भागवत तसेच प्राची येजरे व हिमानी रेडेकर यांनी योगाचे महत्त्व विषद केले. यावेळी २६४ विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचा सराव केला.

कार्यक्रमास प्राचार्य रामकृष्ण मगदूम, संचालक विजय सावेकर, क्रीडा विभाग प्रमुख विशाल वडवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.हनुमान तरुण मंडळ, उत्तूर व अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष भारत लोखंडे यांनी स्वागत केले.

योगशिक्षक प्रा. सुरेश धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व आरोग्यविषयक उपयुक्त प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या शिबिरात अनेक योगसाधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.तसेच केंद्र शाळा व कुमार शाळा येथेही योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.दीपक कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून योगासने करून घेतली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व पालक व उपस्थिती होती.

फोटो क्लिक…

पावसाने ओढ दिली. आजरा गडहिंग्लज संकेश्वर पर्यंत शेती समृद्ध करणाऱ्या चित्री प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला आहे… युनूस सय्यद यांनी टिपलेले हे छायाचित्र.

थोडक्यात बातम्या 

♦ अवघ्या अकरा चेंडूत अर्धशतक झळकावत वैभव सूर्यवंशीने ‘ लिस्ट ए क्रिकेट’  मधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विश्वविक्रम नोंदवला आहे. यामध्ये त्याने पाच चौकार व पाच षटकार ठोकले. 

♦ पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्या नदी जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स ची उभ्या ट्रकला धडक बसून त्यामध्ये एकनाथ बापू कांबळे (वय ७५) व स्नेहल उत्तम कांबळे ( वय १६ ) या आजोबा व नातीचा मृत्यू झाला.

♦ आजरा शहरात किरकोळ पाऊस वगळता तालुक्यात ठीक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गडहिंग्लज, उत्तूर, नेसरी भागातही पाऊस झाला आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : २२ जून २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : अष्टमी (दुपारी ०३.३९ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (सकाळी १०.२१ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : व्यातीपात योग (सकाळी १०.३० पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : भाव करण (दुपारी ०३.३९ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४३ ते सकाळी ०९.२२ पर्यंत.
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१४ ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.०३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आज

संबंधित पोस्ट

आज-यात गोवा बनावटीच्या दारुसह  साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

mrityunjay mahanews

बाळासाहेब आजगेकर यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीचा धुमाकूळ… ट्रॅक्टर सह बैलगाडी केली पलटी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!