mrityunjaymahanews
अन्य

गुरूवार – सातच्या बातम्या

गुरूवार ११

जून २०२६

मसोली टोलनाका हलवण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पालकमंत्री आबिटकरांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी प्राधान्याने त्यांनी आजरा शहरानजीक असणाऱ्या टोल नाक्या बाबत चर्चा केली.

संकेश्वर-आजरा-आंबोली राष्ट्रीय महामार्गावरील विद्यमान टोल नाका आजरा शहराजवळ असल्याने स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. शहराचा विस्तार आणि वाढती वस्ती लक्षात घेता हा टोल नाका घाटकरवाडी-आंबोली मार्गादरम्यान स्थलांतरित करण्याची अनेक नागरिकांची मागणी असुन, टोल नाका स्थलांतरित केल्यास स्थानिक प्रवाशांची गैरसोय कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढेल, असेही प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांना सांगितले.

मुख्याध्यापक सहविचार सभा उत्साहात

शिक्षण समिती सभापतीची उपस्थिती : शैक्षणिक प्रश्नावर चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात मुख्याध्यापक सहविचार सभा उत्साहात झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापती शितल प्रविण यादव अध्यक्षस्थानी होत्या. आजरा पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने कार्यक्रम झाला.

या वेळी पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, उपसभापती यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, पंचायत समिती सभापती विकास चाथे, समीर पारदे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डा. मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी श्री. काकडे प्रमुख उपस्थित होते. शैक्षणिक प्रश्नावर चर्चा झाली.

गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी आजऱ्याच्या शैक्षणिक कामाचा आढावा मांडला. ते म्हणाले, शिष्यवृत्ती, आधार, आधार आयडी, पीजीआय, मिशन अंकूर या सर्व क्षेत्रात आजरा तालुका आघाडीवर आहे. शिक्षणात तालुक्याची प्रगती उतम आहे. श्रीमती यादव यांनी आजरा तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. यंदाच्या वर्षातील शैक्षणिक उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. मीना शेंडकर यांनी विविध प्रश्नासंदर्भात चर्चा केली व मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांच्या प्रश्नाना उतरे दिली. या वेळी सुधीर देसाई, शिरीष देसाई, विकास चाथे, समीर पारदे यांची भाषणे झाली. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक उपस्थित होते.

विद्युत अधिकाऱ्यांचा सत्कार 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्याच्या वीजपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला मलिग्रे येथील ३३ के.व्ही. पर्यायी फिडर कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मुमेवाडी–आजरा ३३ के.व्ही. लाईनमध्ये बिघाड झाल्यास आजरा शहर व परिसराला तब्बल २० ते २४ तास अंधारात राहावे लागत होते, त्या समस्येवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघाला आहे.

मुमेवाडी–आजरा ३३ के.व्ही. लाईनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असे. याचा परिणाम औद्योगिक क्षेत्र, शासकीय कार्यालये तसेच व्यापारी व व्यावसायिकांवर होत होता. या गंभीर समस्येची दखल घेत अन्याय निवारण समिती व नगरसेवक यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, आजरा कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली.
इतर तालुक्यांमध्ये मुख्य लाईनमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध असताना आजरा विभागासाठी अशी व्यवस्था का नाही याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

या चर्चेदरम्यान श्री. संजय पोवार, कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग गडहिंग्लज यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यावेळी आजरासाठी मलिग्रे येथे पर्यायी फिडर उपलब्ध असून काही तांत्रिक कारणांमुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात आले. तसेच आवश्यक कामे पूर्ण करून १५ दिवसांच्या आत फिडर कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली होती.

दिलेल्या आश्वासनानुसार श्री संजय पोवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता श्री. कोळी  तसेच लाईनमन श्री. संतोष डोंगरे व ठेकेदार विग्नहर्ता एटरप्राईजचे श्री. हेमंत पेडणेकर यांचे सुपरवायझर श्री. शंभूचे व चंद्रकांत कोरवी यांचे संपूर्ण पथकाने युद्धपातळीवर काम करत आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण केली आणि मलिग्रे ३३ के.व्ही. पर्यायी फिडर यशस्वीरित्या कार्यान्वित केला.
या उल्लेखनीय कार्याबद्दल अन्याय निवारण समिती तसेच आजरा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी मलिग्रे सब-स्टेशनला भेट देऊन श्री. कोळी व श्री. संतोष डोंगरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

सत्कार समारंभास नगरसेवक व अध्यक्ष अन्याय निवारण समिती श्री. परशुराम बामणे , नगरसेवक श्री. परेश पोतदार, माजी नगरसेवक श्री. बाळ केसरकर, माजी नगरसेवक श्री. किरण कांबळे, श्री. ज्योतीप्रसाद सावंत,श्री अरिफ खेडेकर तसेच अन्याय निवारण समितीचे गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, मिनीन डिसोझा आदींसह मलिग्रे सब-स्टेशनचा संपूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुनील सुतार यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

विद्यावर्धिनी नागरी सह. पतसंस्था आजराच्या नुतन चेअरमनपदी सुनील सुतार यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी बळवंत शिंत्रे, श्री. पांडूरंग शिप्पुरकर, तालुका सहाय्यक निबंध कार्यालयाचे प्रमोद फडणीस, सुभाष विभूते, संचालक म्हाळसाकांत देसाई, किरण आमणगी, दिनकर देसाई, दयानंद पाटील, उत्तम कोकीतकर, नितीन पाटील, जानू कोकरे, मीना खाडे, सारीका पाटील, माधुरी कांबळे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थीत होते.

महिला सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी वनश्री देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोलीच्या सरपंच वनश्री रवींद्र देसाई यांची सरपंच परिषद मुंबईच्या आजरा तालुका महिला अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडीचे पत्र राज्य कार्यकारिणीने नुकतेच त्यांना दिले.

देसाई यांची महिनाभरापूर्वी पेरणोलीच्या सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर त्यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.

मडीलगेत ‘मैत्री फाऊंडेशन’चे उत्साहात उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडीलगे (ता. आजरा) येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘मैत्री फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. गावातील सुशिक्षित व समाजाभिमुख तरुणांनी एकत्र येत स्थापन केलेल्या या संस्थेमुळे सामाजिक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

श्री शंकरलिंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान पतसंस्थेचे चेअरमन गणपतराव पाटील व माजी सभापती भिकाजीराव गुरव यांच्या हस्ते फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान संस्था समूहाचे अध्यक्ष के. व्ही. येसणे होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरपंच बापू निऊंगरे यांनी केले.

यावेळी फाऊंडेशनचे सदस्य प्रा शिवाजी पारळे यांनी संस्थेची स्थापना, उद्दिष्टे आणि भावी उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली. गाव व परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजूंसाठी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता अभियान, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्यास जनार्दन नेऊंगरे, आजरा कारखाना संचालक दीपक देसाई, शिवाजी गुरव तालुका संघ संचालक ज्ञानदेव पोवार पांडुरंग वजरेकर ,मनसे तालुकाध्यक्ष आनंदराव घंटे तंटामुक्त अध्यक्ष निवृत्ती पाटील गणपतराव आरळगुंडकर, जालंधर येसणे,सखाराम येसणे माजी सैनिक गोविंद निऊंगरे बाबूराव पाटील डॉ आनंद कांबळे विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष बातम्या...

♦ नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. चालू वर्षी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून पुढील वर्षी महामार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर मध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या स्फोटात गोडोली/ शाहूवाडी येथील जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण व कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव हे दोघे शहीद झाले आहेत.

♦ जगबुडी नदीत बुडून मुंबईहून खेडमध्ये नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आलेले आकाश रामा कांबळे नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तीन भाऊ बुडून मृत्युमुखी पडले.

♦ पळशिवणे-गंगापूर (ता. भुदरगड) मुख्य रस्त्यावरील घाटातील तीव्र वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अंगणवाडी सेविका सुनीता जोतीराम पोवार (वय ५९) व शामराव तुकाराम चव्हाण (वय ७५, दोघेही रा. पळशिवणे,ता. भुदरगड) यांचा मृत्यू झाला आहे. तर जोतीराम चिनू पोवार हे गंभीर जखमी झाले.

आजचे पंचांग 

दिनांक : ११ जून २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : एकादशी (रात्री १०.३६ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : रेवती नक्षत्र (सकाळी ०८.१७ पर्यंत) त्यानंतर अश्विनी नक्षत्र
योग : शोभन योग (१२ जून रात्री १२.५९ पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : भाव करण (सकाळी १२.५२पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : मीन राशी (सकाळी ०८.१६ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१७ ते दुपारी ०३.५७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ आजरा येथे धबधब्याशेजारी लघुशंका , अश्लील चाळे

mrityunjay mahanews

Breaking News

आवंडी धनगर वाड्यावर आठ देशी गाईंचा आकस्मिक मृत्यू..मलिग्रे येथील आगीत 5 म्हैशी जखमी,एक मयत…जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात ९९.७१ टक्के वसुली…आजऱ्यात  कृषि दिन कार्यक्रम उत्साहात…संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे १ कोटी ५७ लाख जमा. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनुदान जमा…पुन्हा गजराजाचे  वेळवट्टी येथे आगमन…..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बुधवार सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!