शनिवार दि. २१ मार्च २०२६


पेरणोली हद्दीत सुरू असलेले बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन थांबवा…
ग्रामस्थांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पेरणोली गावच्या हद्दीत सुरू असलेले बेकायदेशीर स्टोन क्रशर व गौण खनिज उत्खनन त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी आजरा तहसीलदारांकडे लक्ष्मण विष्णू हळवणकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
शासन नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही वैध परवान्यांशिवाय सदर उत्खनन सुरू आहे. या संदर्भात पोलीस पाटील, तलाठी , ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी तक्रार करूनही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. सदर बेकायदेशीर उत्खननामुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हवा व ध्वनी प्रदूषण वाढले आहे. या ठिकाणची तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा व बेकायदेशीर स्टोन क्रशरसह उत्खनन बंद करण्यात यावे. याचबरोबर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा व त्यांची यंत्रसामग्री व वाहने पण जप्त करावी. संबंधित तलाठी यांच्यावर कारवाई का झाली नाही याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या लेखी निवेदनावर अरविंद विष्णू नावलकर, महादेव धोंडीबा नावलकर, चंद्रकांत महादेव शिवणे, शिवाजी सखाराम मस्कर, कृष्णा आप्पा नावलकर, रंगराव नाना नावलकर,दशरथ कृष्णा नावलकर तानाजी मारुती सासुलकर आदींच्या सह्या आहेत.

ग्रामीण रुग्णालय आजरा येथे H.P.V. लसीकरण मोहीम शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रामीण रुग्णालय आजरा येथे H.P.V. लसीकरण मोहीम शुभारंभ व जागतिक मौखिक आरोग्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष श्री अशोकअण्णा चराटी यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले. डॉक्टर प्राचीका धारकर यांनी जागतिक मौखिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने मौखिक आरोग्य व दातांची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. HPV लसीकरण हे महिलांच्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगा विरुद्ध प्रभावी अस्त्र आहे. व ही लसीकरण मोहीम सर्वांनी यशस्वी करूया असे आवाहन नगराध्यक्ष श्री.अशोकअण्णा चराटी यांनी यावेळी केले.
यावेळी नगरसेविका आसावरी खेडेकर , नगरसेवक श्री.परशुराम बामणे भ, नगरसेवक श्री. अनिकेत चराटी, आमदार प्रतिनिधी श्री. विजय थोरवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव, ग्रामीण रुग्णालय आजरा मधील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर सुरजित पांडव यांनी केले.

धर्म वाचला,तरच देश वाचेल-ह.भ.प. श्री प्रणवसिंह राजपूत

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
“हजारों वर्षांचा गौरवशाली इतिहास व परंपरा असणारा सनातन हिंदूधर्म व संस्कृती ही विश्व कल्याणाची भावना व्यक्त करणारी आहे. हा धर्म वाचला, तरच देश वाचेल.सध्याच्या काळात धर्मांतर,लव्ह जिहाद,अवैध घुसखोरी यांसारखी अनेक संकटे समाजासमोर उभी ठाकली आहेत.हिंदू समाजाने आपले अंतर्गत सर्व भेद विसरुन, संकुचितपणाचा त्याग करुन तरुणाईला धर्माभिमानाचे आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार देणे ही काळाची गरज आहे.आपली भारतमाता पुन्हा एकदा परमवैभवाला नेण्यांकरीता जागृत हिंदू समाजाने छत्रपती श्री शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा सदैव मनांत जपली पाहिजेत,”असे प्रतिपादन ह.भ.प. श्रीप्रणवसिंह राजपूत यांनी केले.सकल हिंदू समाजाचे वतीने, देवर्डे ता.आजरा येथे आयोजीत, विराट हिंदू संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी उपस्थित असणारे धर्माचार्य वेदशास्रसंपन्न डाॅ.श्री.के.डी.हिरेमठ यांनीही आपले आशीर्वचनपर मनोगत व्यक्त केले.
सकल हिंदू समाजाने भारतीय संस्कृतीचे महत्व समजून घेऊन,त्याप्रमाणे यथाशक्ती आचरण करावे,असे आवाहन त्यांनी केले.
संमेलनाची सुरुवात छत्रपती श्रीशिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने वेदमंत्रांच्या घोषात झाली.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
श्री. मारुती गोरे यांनी सूत्रसंचालन व निवेदन केले.तर श्री.बळीराम तानवडे यांनी आभार मानले.

व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिरचे गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत उज्ज्वल यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव शिक्षण संकुलातील प्राथमिक विद्या मंदिरच्या विध्यार्थ्यांनी गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत भरघोस मेडल मिळवत उज्ज्वल यश संपादन केले.
या परीक्षेत इयत्ता पहिली ते चौथी विद्याथ्यांनी प्रवेश घेतला होता.
यातील राज्यस्तरीय मेडल धारक विद्यार्थी-
एकादशी संदीप बरगे,श्रीशा सागर पारपोलकर, वेदांत अमित शेळकंदे ,भूपेंद्र रामदास होरटे ,शौर्य संतोष बेलवाडे ,शार्वी सुयोग जाधव ,इरा प्रकाश पाटील ,निदा इरशाद लमतुरे ,ध्रुव मंदार सुतार ,राजवीर युवराज पोवार ,वरद एकनाथ वंजारे ,सान्वी सागर किरुळकर , स्वराली हणमंत गजरकर ,अन्विता अजित चौगुले, रितुल विवेक चव्हाण ,स्वराज नितीन गुडूळकर , स्मिरा स्वप्नील कातकर ,राज्ञी संतोष डोंगरे , प्रांजल नंदकुमार पाटील, स्वरांगी सचिन चव्हाण,ज्ञानी विलास गवारी, अद्विता किशोर खोत
तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी-
रुद्रराज मधुसूदन देसाई ,समीक्षा संभाजी लोहार ,कनिष्क कुणाल पोतदार,अर्पिता अश्विन डोंगरे ,प्रन्वी प्रसाद कुंभार ,मिष्टी रविकांत मांगले ,विहान बाळू मिसाळ ,जन्नत जाफर माणगांवकर ,ऐश्वर्या युवराज देसाई, अम्मार आदम हेरेकर ,वरद विनायक देसाई ,साहिल संदीप बल्लाळ ,मनस्वी मनोज पंडित, सलोनी रवींद्र देसाई , रनवीर रणजित डोंगरे , राजनंदिनी सचिन इंदुलकर , रुद्र विजय कोळी , उर्वीता विक्रम देसाई , श्रीशा अमित बेलगुंदकर , कैवल्य संदीप ढवळ ,तमीम आरिफ मालदार,अफराज मुजमिल लमतुरे ,आरमान अकबरअली मालदार ,आयुष संतोष कांबळे,श्लोक संतोष नेवगे,देविका श्रीकांत देसाई,सार्थक संजय चव्हाण,आराध्या पांडुरंग राणे.
सर्व विद्यार्थ्यांना सौ.आर.एच.गजरकर, श्री.डी.बी.डेळेकर, सौ. एन.सि.हरेर,, सौ.एम. के.खोत,सौ.एन.आर. हसबे,सौ. एल.पी. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्या मंदिर शेळप शाळेत महिला मेळावा उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्या मंदिर शेळप शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हळदी-कुंकू व महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती आजराच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार होत्या.
कार्यक्रमानिमित्त महिलांच्या संगीत खुर्ची, मकडी चाल, फुगे फोडणे व जोडीदाराच्या मदतीने फुगा घेऊन धावणे या फनी गेम्स घेण्यात आल्या. मुख्याध्यापक श्री. संभाजी बापट यांनी आपल्या प्रस्ताविकात शाळेने वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच भविष्यातील येणाऱ्या समस्यांचा वेध घेऊन शाळा विद्यार्थ्यांप्रती गुणवत्तापूर्ण शिक्षणावर कसा भर देत आहे याची माहिती दिली. स्पर्धेमधील विजेत्या सौ. माधवी तेजम, सौ. अंकिता नार्वेकर, सौ. अश्विनी डोंगरे सौ. सोनाली माडभगत, सौ. नीता नवार, सौ. कविता पाटील यांना उपसभापतींच्या हस्ते बक्षीस वितरण केले. महिला आरोग्य व आजची स्त्री या विषयावर हाळोली शाळेच्या अध्यापिका सौ अर्चना पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला बचत गट व महिलांना येणाऱ्या समस्या याबाबतीत महिलांनी पंचायत समितीशी संपर्क करावा असे आवाहन उपसभापतीनी केले. महिलांच्या समस्या सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिले जाईल असे उपस्थित महिलांना आश्वासन दिले. उपसभापतीनी शाळा व कामकाजाची पाहणी करून शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी गौरव उद्गार काढले.
कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच श्री. अर्जुन बागडी व ज्येष्ठ सदस्य श्री. सुधाकर पाटील, महिला सदस्या सौ. उर्मिला गुंजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. जयसिंग पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सूत्रसंचलन श्री. परमेश्वर नलवडे यांनी केले तर आभार श्री.रवींद्र नावलकर यांनी मानले.

जागतिक जल दिनानिमित्त उद्या चित्री धरण परिसर स्वच्छता व परीक्रमेचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२२ मार्च “जागतिक जल दिन” म्हणून जगभरात पाळला जातो. ९७% पाणी महासागरातील खारे पाणी, ३% गोडे पाणी आहे.३% गोडे पाणी मध्ये ७०% बर्फ व हिमनदी स्वरूपात तर फक्त ३०% पाणी भूजल स्वरूपात आहे, म्हणजे फक्त १%च पाणी पृष्ठभागीय गोडे पाणी आहे.
गोड्या पाण्याच्या मूल्याबद्दल व स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गोड्या पाण्याच्या संसाधनाचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यासाठी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक जल दिनाचे या वर्षाचे आशय “जल आणि लिंग ” Water and gender असे आहे.चित्री ही नदी हिरण्यकेशी नदीचे उपनदी असून आवंडी धनगरवाडा नंबर ३ जवळ तसेच आजरा तालुका व चंदगड तालुक्याच्या सीमेवर आणि घनदाट वनामध्ये त्याचे उगम आहे. नदीची लांबी अंदाजे २५-३९ कि.मी. असून त्याच नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा “चित्रि मध्यम प्रकल्प” बांधण्यात आले आहे. एकूण १.९ TMC पाणी साठा असून आजरा तालुक्यातील २३ गावे व गडहिंग्लज तालुक्यातील ३१ गावानां पिण्यासाठी व सिंचनाचा लाभ मिळत आहे. म्हणजे एकंदरीतच चित्री नदी या २ तालुक्याची जीवन वाहिनी आहे. विविध संस्थेच्या मदतीने व tadnyanchya मार्गदर्शनाखाली संपूर्ण चित्री खोऱ्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
जलसंपदा विभाग, चित्रि ॲडव्हेंचर इको व ऍग्रो टुरिझम सह्याद्री ॲडव्हेंचर, कृतांत पर्यावरण मंडळ,सारथी फाउंडेशन अशा विविध संस्था व यांच्या सहाय्याने रविवार दि.२२ मार्च २०२३ रोजी चित्रि प्रकल्प परिसर स्वच्छता व परीक्रमेचे नियोजन केले आहे.
परिक्रमेचे वेळी संबंधित विषय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पाणी,माती, दगड, वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी व प्राण्यांविषयी माहिती घेण्यात येणार आहे अशी माहिती अनिल मगर यांनी दिली. यावेळी आनंद पाटील, प्रा. सुनील शिंत्रे उपस्थित होते.

फोटो क्लिक

महागाव ते आजरा रस्त्याचे काम सुरू आहे .त्यामुळे एस .टी. महामंडळाचे वेळापत्रक कोलमडल्या मुळे कानोली ,सरंबळवाडी, हारुर, गजरगाव येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी असा प्रवास करावा लागतो.

ईदच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात पोलिसांनी संचालन केले.

छाया वृत्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच ज्येष्ठ पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार बशीर मुल्ला, विकास सुतार, रणजीत कालेकर, अमित गुरव, सुभाष पोवार, सुनील पाटील, हसन तकीलदार, गोपाळ गडकरी यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

गुढीपाडव्या दिवशी ‘ वाटंगी सन्मित्र ‘ कडे ५७ लाखांच्या ठेवी जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सन्मित्र पत संस्था वाटंगी या संस्थेत गुढीपाडवा शुभमुहर्तावर ५७ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. संस्थेच्या वाटंगी नेसरी व आजरा या शाखेतून गुढीपाडवा शुभमुहर्तावर ठेवी जमा केल्या. खास गुढीपाडवा निमित्त संस्थेकडून ठेवीदारांसाठी १० % व्याजदराची सुवर्ण संधी दिली असल्याचे चेअरमन अल्बर्ट डिसोझा यांनी सांगितले .
परिसरातील ठेविदारामध्ये संस्थेची असणारी विश्वासाहर्ता ही या शुभमुहूर्तावर जमा झालेल्या ठेवीवरून समजते , असे चेअरमन अल्बर्ट डिसोझा यांनी प्रतिपादन करून सर्व ठेवीदारांचे आभार मानले .
त्याचबरोबर व्हा. चेअरमन भीमराव सुतार ,व्यवस्थापक परशराम गिलबिले , नेसरी शाखाधिकारी विजय पोवार , आजरा शाखाधिकारी विलास राजाराम व वाटंगी, नेसरी आजरा शाखेतील सर्व संचालक व कर्मचारीवर्ग यांचे याकामी सहकार्य लाभल्याचे डिसोझा यांनी सांगितले .


आजचे पंचांग
दिनांक : २१ मार्च २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : तृतीया तिथी (रात्री ११.५६ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (२२ मार्च पहाटे १२.३७ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : इन्द्र योग (सायंकाळी ०७.०० पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : तैतुला करण (दुपारी ०१.१४ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.४४ ते सकाळी ११.१५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२२ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.४३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



