
मंगळवार दिनांक ८ सप्टेंबर २०२६

एमडी ड्रग्ससह एक लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात दोघांना अटक

आजरा : प्रतिनिधी
आजरा पोलीस ठाणे हद्दीत आजरा – आंबोली रोडवरील शाबाज फार्मकडे जाणाऱ्या रोडवर दोन व्यक्ती एम डी ड्रग्स घेऊन येणार आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने आम्ही स.पो.नि. बाबासाहेब सरवदे, आजरा पोलीस ठाणे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यांनी पंचासह संयुक्त कारवाई करत सापळा रचून इसम अन्वर असलम शेख (वय ३४ वर्ष रा. सरनाईक वसाहत, जवाहर नगर कोल्हापूर) व किरण दडप्पा माने (वय ३३ वर्ष, रा. शिवाजी पार्क कोल्हापूर ) यांना १६ ग्रॅम एम डी पावडर, एक एक्सेस मोपेड स्कूटर व दोन मोबाईल सह १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने दोघेजण चालले होते.
याबाबत एन.डी पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

उच्चस्तरीय समितीकडून प्रस्तावित घाटकरवाडी हत्ती संगोपन केंद्र जागेची पाहणी

आजरा : प्रतिनिधी
उच्चस्तरीय समितीने घाटकरवाडी (ता. आजरा) येथील प्रस्तावित हत्ती संगोपन केंद्राच्या (ट्रेटमेन्ट ॲंण्ड ट्रान्झिट सेंटर) जागेला भेट दिली. वनपरिक्षेत्रासह वन्य हत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रस्तावित जागेची उपयुक्तता, मानव हत्ती संघर्षाच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. या केंद्राची मंत्री अंतीम टप्प्यात असून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून यासाठी पाठपुरावा सुरु आहे. यावेळी हत्ती बाधीत शेती क्षेत्रालाही समिती सदस्यांनी भेट दिली.
या काही वर्षात पीकांचे नुकसान आणि मानव हत्ती संघर्ष वाढला आहे. हत्तींच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक पातळीवर सक्षम व शास्त्रोक्त सुविधा उपलब्ध होणे आवश्यक झाले आहे. वन्य हत्तींच्या वावरामुळे मानव हत्ती संघर्षाचे वाढते आव्हान. पीक नुकसान, जखमी, आजारी किंवा संकटग्रस्त वन्य हत्तीना तातडीने वैद्यकीय उपचार, निगा, सुरक्षित संक्रमण व व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व स्रक्षित सुविधा आवश्यक आहेत. पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी हत्ती संगोपन केद्र आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. या वेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी आजरा वनपरिक्षेत्रातील वन्य हत्तींची सद्यस्थिती, हत्तींचा वावर, बाधित परिसर, मानव हत्ती संघर्षाची परिस्थिती तसेच वन्य हत्ती व्यवस्थापनाबाबत वनविभागाची भूमिका, उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर समितीने वन्य हत्तींच्या वावरामुळे नुकसान झालेल्या शेती क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या.
कोल्हापूर वनवृत्तकडील विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, आजऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘रवळनाथ’ च्या आजरा शाखेत अमृतमहोत्सवी, सेवानिवृत सभासद, विद्यार्थ्यांचा सत्कार

आजरा : प्रतिनिधी
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या आजरा शाखेत संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले व चेअरमन प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा शाखेत आयोजित अमृतमहोत्सवी व सेवानिवृत्त सभासद, यशवंत पाल्यांचा सत्कार समारंभ पार पडला अध्यक्षस्थानी आजरा महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य तथा संस्थेचे संचालक प्रा. डॉ. किरण पोतदार होते. संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, शाखा चेअरमन प्रा. जनार्दन दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. किरण पोतदार म्हणाले, स्थापनेपासून संस्थेने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे संस्थेमार्फत सर्वशाखांमध्ये मोबाईल बँकिंग, अद्ययावत सर्व डिजीटल बँकिंग सेवा दिल्या जातात. तसेच RTGS/NEFT सुविधा, वीज बीलभरणा यासह जेष्ठ नागरिक तसेच गंभीर आजारी व वयोवृध्द ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते. आकर्षक व्याजदर मिळणा-या विविध ठेव योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
याप्रसंगी प्रा. किरण प्रधान, श्री. केशव पंडीत, श्री. सीताराम सरदेसाई, श्री. गणपतराव ढेकळे, मा. वैशाली आपटे, सौ. शकुंतला दळवी यांचा अमृतमहोत्सवी तर श्री. अल्बर्ट फर्नांडीस, श्री. गजानन नांदिवडेकर, मा. शितल हरेर, श्री. विजय कांबळे, श्री सुभाष विभुते, श्री. चंद्रकांत गुणे, श्री. संजय शिवणे, श्री अजित तोडकर यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार करण्यात आला. तसेच कु. राजवर्धन पाटील, कु. गतिमा अडकूरकर, कु. गितांजली पाटील या यशवंत पाल्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य गौरव भूषण पुरस्कार मिळालेबद्दल डॉ. संदीप देशपांडे व पोलीस दलात निवड झालेबद्दल कु. संध्या पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री. गजानन नांदीवडेकर व श्री. सुभाष विभूते या सत्कारमुर्तीनी आपल्या मनोगतातून सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शाखा चेअरमन प्रा. जनार्दन दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शाखा सल्लागार सौ. शामल हरेर यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. डॉ. राजीव कर्पे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाखा सल्लागार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, श्री. गणपती नाईक, श्री. गौतम सुतार, श्री. बाळकृष्ण दरी, सौ. वर्षा शेलार, शाखाधिकारी श्री. दीपक शिंदे यांच्यासह सभासद, ठेवीदार, विद्यार्थी उपस्थित होते.

NCMC स्मार्ट कार्ड सक्ती पुर्णपणे बंद करा…
गिरणी कामगार संघटना व प्रवासी वर्गाची मागणी

आजरा : प्रतिनिधी
शासनाच्या वतीने जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व महीला ना पुर्वी प्रमाणे एस टी सवलत कायम स्वरुपी चालू ठेवावी अशी मागणी गिरणी कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व प्रवासी वर्गातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस, प्रवासामध्ये जेष्ठ नागरिक महिला व विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार प्रवास भाड्यात सवलत दिली जाते, पूर्वीप्रमाणे संबंधित पात्र प्रवाशांनी आधार कार्ड अथवा वैद्य पास ओळखपत्र दाखवल्यास सवलतीचा लाभ मिळत होता ही पद्धत सोपी पारदर्शक व प्रवासांच्या दृष्टीने सोयीची होती. आता मात्र सवलतीचा लाभ घेण्यासाठी एन सी एम सी स्मार्ट कार्ड काढणे व त्यामध्ये रिचार्ज करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे यामध्ये ग्रामीण भागातील प्रवाशांचे फार हाल होत आहेत. सवलत मिळण्यासाठी स्वतंत्र स्मार्ट कार्ड काढण्याची सक्ती करणे ही मूळ सवलतीच्या उद्देशालाच बाधा आणणारी बाब आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागातील प्रवासी आणि विद्यार्थी यांना नवीन पद्धतीमुळे अनावश्यक त्रास व आर्थिक भार सहन करावा लागत आहे. पूर्वीप्रमाणे पात्र प्रवाशांना आधार कार्ड दाखवून वैद्य पास ओळखपत्र दाखवून आवश्यक असलेल्या संबंधित पात्रतेचा पुरावा दाखवून थेट बस मध्ये सवलतीची तिकीट देण्याची पद्धत कायम ठेवण्यात यावी. एन सी एम सी कार्ड सर्व्हर डाऊन, नेटवर्क बंद किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे सवलत मध्ये जेष्ठ नागरिक विद्यार्थी व महिलांना गैरसोयचे होत असल्याने वाहकांना मानसिक त्रासाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे. यासाठी स्मार्ट कार्ड सक्ती पूर्णपणे रद्द करून पुर्वी प्रमाणे सवलत कायम ठेवण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
कॉ.शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, नारायण भडांगे, महादेव होडगे,निवृत्ती मिसाळे , मनपा बोलके, नंदा वाकर, सत्यवती शेटगे, विठ्ठल बामणे, प्रकाश निकम, कृष्णा सुतार, निवृत्ती कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक गिरणी कामगार व माकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

१,१११ नागरिकांच्या सह्यांसह उत्तूर बसस्थानकासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे.

उत्तूर : प्रतिनिधी
अचानक बंद पडलेल्या उत्तूर बसस्थानकाच्या बांधकामाला तातडीने पुन्हा सुरुवात करावी, या मागणीसाठी उत्तूर ग्रामस्थांच्या वतीने श्री. संभाजी कुराडे यांच्या नेतृत्वाखाली १,१११ नागरिकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल राठोड यांना सादर करण्यात आले.
शिष्टमंडळाशी सुमारे २५ मिनिटे चर्चा करताना जिल्हाधिकाऱ्यांनी, स्टे ऑर्डर नसताना काम कोणी बंद केले? असा सवाल उपस्थित केला. कोणताही अधिकृत स्थगिती आदेश नसतानाही बांधकाम थांबले असल्याने, २१ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इरादा श्री. संभाजी कुराडे यांनी व्यक्त केला. या शिष्टमंडळात अतिश देसाई, एस. टी. हाळवणकर, सौरभ वांजोळे, विराज कुराडे, सुरज दिवटे व सुनिल सारंग सहभागी होते.
यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. सरपंच किरण आमणगी यांनी बांधकाम सुरू करण्याचा आदेश एसटी महामंडळाला दिल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर विलंब होत असल्याची तक्रार मांडली. त्यावर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अडचणी दूर करून २१ सप्टेंबरपर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना निर्धारित मुदतीत बांधकाम सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

श्रीहरीकाका मठात गोकुळअष्टमी उत्सव उत्साहात

गडहिंग्लज : प्रतिनिधी
हत्तरगी- यमकनमर्डी येथील पुरातन श्रीहरीकाका गोसावी भागवत मठात गोकुळ अष्टमी उत्सव उत्साहात संपन्न झाला.अष्टमीनिमित्त गोपाळकाला पीठाधीश डॉ. आंनद गोसावी यांच्या दिव्य सानिध्यात, चीफ ट्रस्टी वेणुगोपाल गोसावी यांच्या हस्ते दहीहंडी फोडप्यात आली. यानिमित्य विविध कार्यक्रम संपन्न झाले.
आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत गोरंबे (ता. कागल) येथील गुरुमाऊली भजनी मंडळाने प्रथम क्रमाकांचे २१ हजाराचे बक्षीस तर शिपुर (ता. गडहिंग्लज) येथील शिवभक्त भजनी मंडळाने रु. १५ हजाराचे हितीय क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. म्हारुळ (ता. करवीर) येथील माऊली भजनी मंडळाने १० हजार रक्कमेचे तृतीय क्रमाकांचेबक्षीस पटकावले.
भजन सम्राट स्थर्धेचा निकाल असा –
उत्तेजनार्थ : प्रथम : वालिमकी भजनी मंडळकुद्रमनी जि. बेळगाव
द्वितीय; काळभैरी भजनी मंडळ गडहिंग्लज
तृतीय समर्थ महिला भजनी मंडळ गडहिंग्लज
चतुर्थ: दत्त महिला भजनी मंडळ गडहिंग्लज
वैयक्तिक बक्षीसे:
उत्कृष्ट गायक – नंदकुमार केसरकर (कुद्रेमनी)
उत्कृष्ट वादक अंकुश सांवत शिपूर
उत्कृष्ट महिला गायक: विजया कुलकर्णी (गडहिंग्लज)
बक्षीस वितरण सुप्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
गोकुळ अष्टमी निमित्य रेडिओस्टार सौ. मानसा गोसावी – ग्रामपुरोहित यांचा गीत गोपाल कार्यक्रम, सौ. स्वरदा पटवर्धन (सांगली) यांचे श्रीकृष्ण जन्म किर्तन, पंडीत सुधीर पोटे (कोल्हापूर) यांचे सुश्राव्य कीर्तन पंडीत ओकार करकुंबी( घटप्रभा) यांचे शास्त्रीय संगीत, मंजुषा कुलकर्णी पाटील यांचे भक्तीगीत गायन झाले.

निधन वार्ता
धाकलू गजरकर
साळगाव ता.आजरा येथील कै.श्री. धाकलू भाऊ गजरकर वय (वर्ष ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. श्री.लक्ष्मीदेवी दूध संस्थेचे चेअरमन श्री.संजय गजरकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा ,मुलगी ,सून नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन मंगळवार दि.०८/०९/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता आहे.
रंजना कांबळे

मुरुडे ता आजरा कै रंजना संभाजी कांबळे ( वय ५५ ) यांचे आकस्मिक निधन झाले.
यांच्या पश्चात पती, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे
सुभाष कांबळे

श्री भावेश्वरी फंड मुंबई /धामणे चे माजी अध्यक्ष श्री सुभाष पांडुरंग कांबळे (वय ५८ वर्षे ) यांचे प्रदिर्घ आजाराने निधन, झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
नंदकुमार शिमणे

मडिलगे तालुका आजरा येथील नंदकुमार पांडुरंग शिमने (वय २८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ तानाजी पांडुरंग शिमने,आई असा परिवार आहे.

फोटो क्लिक…

किटवडे धनगर वाड्यावर वस्ती शेजारीच हत्तीने काल सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान हजेरी लावली.

आजचे पंचांग
दिनांक : ८ सप्टेंबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (दुपारी ०२.४२ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : पुष्य नक्षत्र (सायंकाळी ०४.३८ पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
योग : परिघ योग (९ सप्टेंबर रात्री १२.३९ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : तैतुला करण (दुपारी ०२.४२ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : कर्क राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४१ ते सायंकाळी ०५.१४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.२६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
