मंगळवार
४ ऑगस्ट २०२६


जखमी रुग्णालयात… आरोपी पोलीस कोठडीत...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजऱ्यातील एक्स्पर्टो बेकरीच्या इमारतीत रविवारी रात्री घडलेल्या थरार नाट्यातील जखमी जिस्नू दिवाकरन पूथनपुरईल/नायर कोल्हापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून या प्रकरणातील आरोपी सामूकीलाल मटरेलाल निषाद व राजकुमार इम्बरसिंह निषाद या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘मृत्युंजय महान्यूज’ ने या प्रकरणाचे फोटोसह सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर काल दिवसभर प्रकरणाची शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू होती. पगारापोटी थकलेल्या पैशाच्या वसुलीसाठी धाक दाखवून दिवाकरन व जिस्नू या बाप- लेकांना मारहाण केल्याप्रकरणी आजरा पोलिसात दिवाकरन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

पांगीरे-गडहिंग्लज काँक्रीटीकरण अंतिम टप्प्यात.
अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम वेळेपूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या पांगीरे-गडहिंग्लज रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसामुळे काही ठिकाणी कामाचा वेग मंदावला असला, तरी उघडीप मिळताच उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक गणेश पवार यांनी दिली. पिंपळगाव बसस्थानकासमोरील सुमारे ४०० मीटर रस्त्याचे काम किरकोळ विरोधामुळे काही काळ रखडले होते. तसेच उत्तूर-कडगाव मार्गावरील मुमेवाडी तळे, मुमेवाडी तिट्टा आणि बामणे घरासमोरील रस्त्याचे कामही सुरू आहे. त्यानंतर दोन्ही यंत्रसामग्रीच्या साहाय्याने उत्तूर बायपासचे काम हाती घेतले जाणार आहे.उत्तूर बायपासबाबत वरिष्ठ अधिकारी व स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक सहकार्य मिळाल्यास काम वेळेपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. बायपास पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
बससेवा होणार सुरळीत…
रस्त्याच्या कामामुळे गडहिंग्लज-गारगोटी मार्गावरील एसटी बससेवा विस्कळीत होत आहे. निर्धारित वेळेत बस धावत नसल्याने चालक-वाहकांसह प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बससेवा वेळेवर सुरू होऊन प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

उत्तुर बसस्थानकाच्या दुरवस्थे विरोधात शिवाजी गुरव यांचा १८ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा
उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर व परिसरातील ४० गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असले जुने एस.टी. बसस्थानक गेल्या ६०-७० वर्षांपासून कोणत्याही मूलभूत सुविधांशिवाय आहे. प्रवाशांना शौचालय व निवाऱ्याची सोय नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी प्रवासी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तातडीने नवीन बसस्थानकाचे काम सुरू करावे, अशी मागणी गुरव यांनी केली आहे.
मागणी मान्य न झाल्यास दि.१८ ऑगस्टपासून उत्तुर बसस्थानकासमोर बेमुदत धरणे व हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा आगारप्रमुखांना दिला आहे.

पावसाची विश्रांती…
घरांची मोठ्या प्रमाणात पडझड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कालपासून पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू आहे. भादवणवाडी येथील शांताबाई शिवराम मोहिते, गणेश वाडी येथील सरस्वती दशरथ मनगुतकर, देवकांडगाव येथील सुशीला वसंत सुतार, कोवाडे येथील सुरेश तुकाराम देशमुख, गणपती मारुती हुंदळेकर, धुळे येथील वसंत हरिबा रेडेकर आदींच्या घरांची मोठी पडझड झाली आहे.
हिरण्यकेशी व चित्री नदीवरील चित्री व सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन्ही नद्या अद्यापही पात्राबाहेरून वहात आहेत.
समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात भात व नाचणा पिक उत्पादकांची चिंता दूर झाली आहे. तालुक्यात सुमारे ७५ घरांची पडझड आज तागायत झाली आहे.

अभिनंदनीय…


आजचे पंचांग
दिनांक : ४ ऑगस्ट २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (रात्री १०.०३ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : रेवती नक्षत्र (रात्री ०९.५३ पर्यंत) त्यानंतर अश्विनी नक्षत्र
योग : धृति योग (रात्री ०७.३२ पर्यंत) त्यानंतर शूल योग
करण : गराजा करण (सकाळी १०.३२ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मीन राशी (रात्री ०९.५३ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५८ ते सायंकाळी ०५.३५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.१७
सूर्यास्त : सायंकाळी ७.१२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता
गंगुबाई गुरव

हात्तिवडे ता. आजरा येथील गंगुबाई जोतिबा गुरव ( वय ९३ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता आहे.
फोटो क्लिक…

मोकाट जनावरे झाली… भटकी कुत्री आहेतच… भरीस भर म्हणून शहरात आता मोकाट घोडेही फिरू लागले आहेत.

